नवीन बोधकथा
संग्रहीत बोधकथा वाचण्यासाठी - क्लीक करा.
स्वावलंबन
एक माणूस कामासाठी दुस-या शहरात गेला. प्रवासात त्याची काही लोकांशी ओळख झाली. तेही कामानिमित्ताने त्याच शहरात चालले होते. त्यांच्यापैकी काहीजण पायी तर काही घोड्यावर स्वार होते. बोलत चालले असताना एका घोडेस्वाराच्या हातून चाबूक खाली पडला. त्या व्यक्तिने त्या घोडेस्वारास खाली उतरू न देता, चाबूक देण्याची तयारी दर्शविली पण त्या सहका-यास नम्रपणे नकार देत स्वत: खाली उतरून त्या घोडेस्वाराने चाबूक स्वत:च हातात घेतला.
खालून मदत करणा-या व्यक्तिने याचे कारण घोडेस्वारास विचारले असता घोडेस्वार उत्तरला,''आपण ज्यावेळी घोड्यावर बसतो तेव्हा चाबूक आपणच सांभाळावा लागतो. आपण प्रत्येक गोष्टीत स्वयंपूर्ण राहिलो तरच आपल्याला यशाची खात्री आहे असे समजावे.''
खालून मदत करणा-या व्यक्तिने याचे कारण घोडेस्वारास विचारले असता घोडेस्वार उत्तरला,''आपण ज्यावेळी घोड्यावर बसतो तेव्हा चाबूक आपणच सांभाळावा लागतो. आपण प्रत्येक गोष्टीत स्वयंपूर्ण राहिलो तरच आपल्याला यशाची खात्री आहे असे समजावे.''
तात्पर्य :- कुणावरही विसंबून न राहता स्वावलंबनाचा स्वीकार केल्याने यश मिळतेच.
एकीचे बळ सर्वश्रेष्ठ
एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्ड्यात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.
तात्पर्य :- एकीचे बळ मोठे असते.
साधू आणि यक्ष
एक साधू तपश्चर्येस एका निर्जन स्थळी बसले होते. त्या ठिकाणी एका यक्षाचे वास्तव्य होते. या गोष्टीची साधूला कल्पना नव्हती. ते जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा निर्जन स्थान पाहून त्यांनी तेथेच ध्यानधारणा सुरु केली. त्या वेळी यक्ष तेथे नव्हता. रात्री जेव्हा यक्ष तेथे आला तेव्हा आपल्या जागेवर दुस-यास व्यक्तीला पाहून त्याला राग आला. त्याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्थेत असलेल्या साधूवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्यांना भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ध्यानस्थ असल्याने त्यांच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्याचा प्रयत्न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्हा अशा जंगली प्राण्यांची रूपे घेतली तरी साधूच्या ध्यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्याने विषारी सापाचे रूप धारण करून त्यांना दंश केला तरीही त्यांच्यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्या प्रयत्नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्याने यक्ष झालेल्या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्या कृपादृष्टीने सापाच्या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्याने त्यांना आदरपूर्वक वंदन केले.
तात्पर्य – एकाग्रता, स्नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो.
आचार्य विनोबा भावे
भूदान चळवळीच्या काळातील ही गोष्ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्यांची पदयात्रा सुरु होती. आपल्या काही शिष्यांसह विनोबाजी मीराजींच्या आश्रमात थांबले होते. अल्पशा विश्रांतीनंतर त्यांची पदयात्रा पुन्हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्हती. त्यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्यामुळे त्यांना खुर्चीत बसवून नेण्यात येत होते. मध्ये मध्ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्हा एक शिष्य त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्ही काय करत होता असे त्या व्यक्तीने विचारले. विनोबाजी म्हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्ट आली. जेव्हा आपल्या मनाविरूद्ध एखादी गोष्ट आली जेव्हा आपल्या मनाविरूद्ध गोष्ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''
तात्पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्याला योग्य दिशा देते.
आत्मनियंत्रणाचे महत्व
एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण तयार करण्यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात. बुद्ध म्हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले,''जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याचे असते.
तात्पर्य :- ज्यांना स्वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो.
महिलेचा निर्भीडपण
एकदा खलिफा उमरला जनतेस मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे भाषणही प्रभावी झाले. अधूनमधून लोकांनी खलिफांना प्रश्नही विचारले. त्यांची खलिफानी समाधानकारक उत्तरेही दिली. खलिफाकडून धर्म आणि नीतीबाबत औत्स्युक्य असणा-या लोकांच्याही प्रश्नांची उत्तरे दिली. याच क्रमाने खलिफाने लोकांना प्रश्न केले. तो म्हणाला,'' जर मी तुम्हाला लोकांना काही आदेश दिला तर तो पाळाल काय'' मोठ्या संख्येने लोकानी सहमती दर्शविली पण एक महिलेने म्हटले,'' नाही, आम्ही तुमचा आदेश पाळणार नाही.'' हे ऐकताच गर्दीतूनही राग व्यक्त झाला. खलिफाने सर्वांना शांत राहण्यास सुचविले. त्या महिलेला याचे कारण विचारले असताती म्हणाली,''तुम्ही तुमचा पायजमा खूपच लांब घातला आहे. माझ्या पतीचा पायजमा गुडघ्यापर्यंतही येत नाही यावरून असे स्पष्ट होते की तुमच्या शाही भांडारामध्ये तुम्ही तुमच्या हिश्श्यापेक्षा जास्त कपडा घेतला आहे.'' महिलेला यातून असे सुचवायचे होते की खलिफाचे बोलण्याप्रमाणे वर्तन नाही. यावर खलिफा म्हणाला,''मला याबाबत माहित नाही पण माझा मुलगा याबाबत उत्तर देईल.'' खलिफाचा मुलगा पुढे आला व त्याने सांगितले,''माझ्या वडिलांनी शाही भांडारातून कपडा घेतलेला नाही. माझ्या हिश्श्याचे कापड मी वडिलांना दिले. सगळ्याप्रमाणेच माझे वडीलही कापड घेत होते त्यात मी वाढ केली'' महिलेचे या उत्तराने समाधान झाले. यावर खलिफा नाराज न होता त्या महिलेला धन्यवाद देऊ लागले कारण खलिफाच्या मते जोपर्यंत जनतेत प्रामाणिक व निर्भीडपणे बोलणारे लोक असणार नाही तोपर्यंत राज्याला किंवा धर्माला धोका नसतो.
मनाची एकाग्रता
एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्याच्या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्याने त्याच्या शिष्यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे ओळखून त्याला सहज पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्याने वृद्ध योद्धा सोडल्यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्याच्या मनात अहंकार जागृत झाला. त्याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्य' हे बिरूद लावून मिरवू. त्याने वृद्ध योद्ध्याला आव्हान दिले. शिष्यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्याचे आव्हान स्वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्यातील विजयाची कल्पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्ये त्याच्यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्या प्रत्येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्याने वृद्धाला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्याने स्वत:हून हार पत्करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्यावर शिष्यांनी व वृद्धाच्या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्हाला अपशब्द वापरत होता तरी तुम्ही शांत कसे राहिलात'' तेव्हा वृद्ध गुरु म्हणाला,'' मुलांनो कोणत्याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्वाची असते. कोणत्याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.''
तात्पर्य : मनाची एकाग्रता साधल्याने बरेचशी कामे साध्य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्यास हमखास यश मिळतेच.
लोभाची शिक्षा
एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्काळ पडला. त्यामुळे ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्ले तर तर त्याची भूक भागेल व माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली. तेव्हा वाघाला त्याची दया आली. तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले. ब्राह्मण अत्यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्याच्यासमोर प्रगटला. त्याला व्यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्यायोगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीस
तात्पर्य – लोभाने माणसाच्या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment