home

रचनावाद रूजवायलाच हवा..

"रचनावाद रूजवायलाच हवा......"

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांतील आठवी इयत्तेचे काही विद्यार्थी इयत्ता दुसरीच्या मुलांइतके ‘कच्चे’असल्याचा अहवाल ‘असर’ने प्रकाशित केल्यावर जी चर्चा सुरू आहे, त्यापैकी हा पुढला लेख शिक्षणप्रक्रियेची बाजू स्पष्ट करणारा आणि शिक्षकांनीच नवनवीन अध्यापन पद्धती आपापल्या विद्यार्थ्यांसाठी रुळवल्याखेरीज ही समस्या सुटणार नाही, हेही सांगणारा..

अलीकडच्या काळात कधी नव्हे एवढे महत्त्व शिक्षणप्रक्रियेला प्राप्त झाले आहे. यापूर्वी महत्त्व होते ते शिक्षणव्यवस्थेला. ज्यात शाळांमधील भौतिक सुविधा, प्रशिक्षित शिक्षकांची उपलब्धता, माध्यान्ह आहार, शिक्षकांची उदासीनता, शिक्षकांचे वेतन इत्यादींचा समावेश होता. पण आता अध्ययन-अध्यापन प्रक्रियेविषयी चर्चा होताना दिसत आहेत. निमित्त आहे, २००५ साली केंद्र सरकारने स्वीकारलेली ‘ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धती’. या अर्थी २००५ साली नव्याने या शिक्षणपद्धतीचा स्वीकार केला, त्या अर्थी त्यापूर्वी ज्ञानरचनावादी पद्धती अस्तित्वात नव्हती. खरेच असे आहे का? शासन पातळीवरून याचा स्वीकार २००५नंतर सुरू झाला इतकेच याबाबत म्हणता येईल. कारण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही अनेक शाळांमध्ये ज्ञानरचनावादावर आधारित काम चालू होते. या शाळा प्रायोगिक पद्धतीने चालणाऱ्या शाळा म्हणून प्रसिद्ध आहेत. कदाचित त्या शाळांना आपण ज्ञानरचनावाद अंगीकारलेला आहे याची कल्पना नसेलही.

 मुलांविषयीच्या आत्यंतिक तळमळीने, सद्यस्थितीतील शिक्षणपद्धतीतील उणिवा लक्षात घेऊन या शाळांनी काम सुरू केले. बालमानसशास्त्राची शास्त्रीय बैठक मात्र त्याला आहे. केवळ प्रायोगिक शाळांमध्येच नाही तर इतरत्रही तुरळक प्रमाणात रचनावादी पद्धतीने काम चालू आहे. आजही आपल्या पिढीला लक्षात राहिलेले जे शिक्षक आहेत (चांगल्या अर्थाने), त्यांनी या वेळी रचनावादी पद्धतीचाच अवलंब केलेला असणार. ‘लक्षात ठेवा’, ‘पाठ करा’, ‘..नाही तर शिक्षा करेन’ असे बोलणारे शिक्षक वेगळेपणाने लक्षात राहात नाहीत.

अर्थातच अशा प्रायोगिक शाळा किंवा सर्जनशील शिक्षकांचे प्रमाण इतके अत्यल्प आहे, की त्यावरून संपूर्ण शिक्षणपद्धतीला रचनावादी म्हणता येणार नाही. सध्याची शिक्षणपद्धती ही वर्तनवादाने प्रभावित शिक्षणपद्धती आहे. ही पद्धती संपूर्ण चुकीची किंवा टाकाऊ नाही. परंतु शिक्षणाची सद्य:स्थितीतील ध्येये पूर्ण करण्यास ती असमर्थ आहे. वर्तनवादी पद्धती ज्या वेळी अमलात आणली गेली, त्या काळानुरूप ती शास्त्रीय होती. आधुनिक काळातील संशोधनांनी ती कालबाहय़ ठरवली आहे. आधुनिक संशोधनावर आधारित शास्त्रीय शिक्षणपद्धती म्हणजे ‘रचनावादी शिक्षणपद्धती’ किंवा ‘ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धती’. या मांडणीवरून असे.

 भासण्याची शक्यता आहे, की वर्तनवादाला विरोध म्हणून रचनावादी पद्धतीचा उगम झालेला आहे. वस्तुस्थिती तशी नाही. रचनावाद एकाएकी जन्माला आलेला आणि कुणा एका तज्ज्ञाची मक्तेदारी असणारा प्रांत नाही. अनेक शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ यांची शेकडो वर्षांची तपस्या त्यामागे आहे. उच्च तंत्रज्ञाने प्राप्त झालेल्या निष्कर्षांचा त्याला आधार आहे. त्यामुळे वर्तनवाद ते रचनावाद असा हा थेट प्रवास नसून, वर्तनवाद-आकलनवाद-रचनावाद असा तो प्रवास आहे. शिक्षणात आता आपण वर्तनवादातून रचनावादाकडे जात आहोत. हा संक्रमणाचा काळ आहे. मानवी मन, मानवी आकलन, वर्तन यांच्याशी घनिष्ठ जोडलेले जे ‘शिक्षण’आहे, त्या शिक्षणातील ही संक्रमणावस्था आहे. इतक्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत इतका मोठा बदल होत असताना काही काळ गोंधळाची स्थिती येणे अत्यंत स्वाभाविक आहे. खरे तर त्याला गोंधळ किंवा अनाकलन म्हणता येणार नाही तर रचनावादी पद्धतीच्या आकलनाचा तो एक टप्पा आहे. या टप्प्यावरच प्रश्न निर्माण होणार, दैनंदिन शालेय कामकाजात समस्या जाणवणार. यावर शोधल्या जाणाऱ्या शास्त्रीय उपायातूनच रचनावादी शिक्षणपद्धती हळूहळू आकार घेईल.

२२ जानेवारी २०१३च्या ‘लोकसत्ते’तील लेखात (‘असर’चे निदान आणि ‘असर’कारी उपाय) प्रा. वसंत काळपांडे यांनी म्हटले आहे, की रचनावादाचे मूळ पाश्चिमात्य देशात आहे हे खरे, पण येथे दोन गोष्टी स्पष्ट कराव्या लागतील. यापूर्वीचा जो वर्तनवाद आपण स्वीकारला होता, त्याचेही मूळ पाश्चात्त्य देशातच होते. दुसरे म्हणजे वर उल्लेख

केल्याप्रमाणे रचनावाद हा आकलनवादावर अवलंबून आहे, ज्यामध्ये मेंदूवर झालेल्या संशोधनांचे मोठे योगदान आहे. हे मेंदू संशोधन असे सांगते, की सर्वसामान्यपणे मानवी मेंदूची रचना सर्वत्र सारखीच आहे. मेंदूतील प्रत्येक भागाचे कार्यही निश्चित स्वरूपाचे आहे, शिकण्याची प्रक्रियाही सारख्याच पद्धतीने घडते (अध्ययनशैली वेगळी असेल, पण शिकत असताना प्रत्येक जण सारख्याच टप्प्यांतून जातो.) असे असताना, रचनावादाचे मूळ पाश्चात्त्य आहे म्हणून रचनावादी शिक्षण पाश्चिमात्यसंदर्भातच घडते असे म्हणता येणार नाही.

राहिले पश्न विद्यार्थ्यांची प्रगती (?), मूलभूत कौशल्यांबाबत झालेली घसरण इत्यादी. एक तर ही समस्या नव्याने समोर आलेली नाही. आपण विद्यार्थ्यांच्या कौशल्याबाबत विचार करत आहोत. हे विद्यार्थी ज्या शिक्षकांचे आहेत त्या शिक्षकांच्या कौशल्यांविषयी हेरंब कुलकर्णी यांनी केलेली सर्वेक्षणे पुरेशी बोलकी आहेत. शिवाय विद्यार्थ्यांची गळती, स्थगन या समस्या जेव्हा शिक्षक प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचाच एक भाग होतात, तेव्हा त्यांच्या अस्तित्वाची नव्याने ओळख होत नाही हे नक्की. त्यासाठी रचनावादी शिक्षणपद्धतीला दोष देणे कितपत योग्य आहे? रचनावादी शिक्षणपद्धती सदोष आहे की त्याची अंमलबजावणी सदोष आहे हे तपासून पाहावे लागेल. कारण रचनावादी शिक्षणपद्धती स्वीकारण्यासाठी रचनावादी दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. वर्गातील मुलांकडे पाहण्याची दृष्टी बदलावी लागेल. पाठय़पुस्तकाबरोबरच पाठय़पुस्तकाबाहेर पाहावे लागेल आणि हे सर्व करण्यापूर्वी हे नक्की का करायचे हे पूर्णपणे समजून घ्यावे लागेल. ही तयारी पूर्ण झाली की मग वर्गातील अध्यापनाकडे वळावे लागेल. सद्य:स्थितीत १०० टक्के रचनावादी पद्धती तात्काळ अमलात आणणे शक्य नसेल तरी अभ्यासक्रमाचे विश्लेषण करून कोणते घटक

या पद्धतीने मुलांसमोर आणता येतील याचा विचार करून सुरुवात केली, की उरलेल्या घटकांसाठीसुद्धा मार्ग दिसू लागतील, कारण मागे म्हटल्याप्रमाणे हा दृष्टिकोन आहे. एकदा दृष्टिकोन आला की अध्ययन-अध्यापन पद्धती सुचत जातील. हे एकटय़ा शिक्षकाचे काम म्हणून न पाहता शाळेतील सर्व शिक्षकांनी एकत्र काम केले तर त्यात सोपेपणा येईल. रचनावादाची ओळख आणि प्रत्यक्ष दैनंदिन कामकाज याबाबत शिक्षकांना जे प्रशिक्षण दिले गेले, त्याची जर शिक्षकांनी गांभीर्याने दखल घेतली असेल फार समस्या येणार नाहीत. अर्थात सर्वच शिक्षक ध्येयप्रेरित आहेत असे गृहीतक येथे आहे.

शास्त्रीय पद्धतीने रचनावादाची अंमलबजावणी झाली तर शिक्षकांवरचा अध्यापनाचा भार कमी होईल तसेच मुलांबरोबर शिक्षकांसाठीसुद्धा शिक्षण ही आनंददायी प्रक्रिया असेल. ज्ञानरचनावाद स्वीकारावा की नाही यावर चर्चा करण्यात आता अर्थ नाही. कारण हा विचारप्रवाह अत्यंत कालसंगत असा आहे. तो स्वीकारण्याखेरीज आता गत्यंतर नाही. आधुनिक काळातील शिक्षणालाही आधुनिक व्हावे लागेल. विद्यार्थ्यांच्या हितासाठी केवळ शिक्षकच नाहीतर पालकांनीसुद्धा रचनावादी शिक्षणपद्धतीचा अविभाज्य भाग बनायला हवे. नव्हे ते आहेतच. रचनावादी शिक्षणासाठी रचनावादी शिक्षक आणि रचनावादी पालक यांची आवश्यकता आहे. दोनही घटक सारखेच जबाबदार आहेत आणि परस्परपूरकही.

आपल्या सुदैवाने महाराष्ट्रात अशा शाळा, संस्था, तज्ज्ञमंडळी आहेत, ज्यांनी रचनावादी पद्धतीचे नमुने उभे केले आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या रचनावादी शिक्षणासाठी ते निश्चितच मार्गदर्शक ठरू शकेल.

समाजातील सर्वच घटक सर्वच समस्यांवर उपाय म्हणून शिक्षणाकडे आशेने बघत आहेत. कारण शिक्षण समाज घडवते. या न्यायाने सध्याची सामाजिक स्थिती जर बि-घडलेली असेल तर त्याचे उत्तरदायित्वसुद्धा

शिक्षणाकडेच जाते. शिक्षणच बि-घडलेले असेल तर आपण कुणाकडे पाहायचे? हे टाळायचे असेल तर रचनावाद रुजायला, विस्तारायला संधी आणि वेळ देऊ या..

No comments:

Post a Comment